Saturday, September 9, 2023

 पडझड की अपयश !

खेळांमधून आयुष्याचे आणि नेतृत्वाचे अगणित धडे गिरविण्याची संधी मिळते. पडायचं, उठायचं, पुन्हा कधीतरी पडायचं अशी पडझड आयुष्यात सुरूच असते. लाटांप्रमाणे जीवन हिंदोळे घेत वरखाली होत असते. एखादा खेळाडू पंधरा मॅचेस खेळला आणि त्यांतील पाच जिंकला म्हणजे दहावेळा तो खेळलाच नाही का?
हारजीत, जयपराजय हे निर्देशक असतात जगण्याचे, खेळण्याचे, धडपडण्याचे पण त्यांवर आपण पटकन यशापयशाचे शिक्के मारून विद्यार्थ्यांना मनोमन नामोहरम करीत असतो. त्यांच्या प्रयत्नांकडे, कष्टांकडे, जिद्दीकडे, सहन करण्याकडे डोळेझाक करीत एक मेडल, एक प्रमाणपत्र, एक पारितोषिक, एक प्रसिद्धी यालाच महत्व देत असतो.
त्याचा काय परिणाम होत असेल त्यांच्या मनावर? बालपणापासून वर्गातील क्रमांक, टक्केवारी, स्पर्धेतील कौतुक या टॅग्स ने कामगिरी तोलली जाते आणि पडझडीपेक्षा अपयशाला अधोरेखित केले जाते.
मुलाखत घेतानाही आम्ही ७५ टक्केवाला निवडतो आणि ७० टक्केवाल्याला नाकारतो, कारण आमच्या मते टक्केवारी बुद्धिमत्तेचे निर्देशक असते. कदाचित तो ७० टक्केवाला अधिक प्रभावी, यशस्वी कर्मचारी, व्यवस्थापक होऊ शकतो पण संधीच नाकारल्याने आम्ही त्याच्या कर्तृत्वावर बोळा फिरवितो. आमच्या अभियांत्रिकी प्लेसमेंट मध्ये टॉपर्सच्या हाती तीन जॉब ऑफर्स असतात ( ज्यापैकी कदाचित तो एकही निवडणार नसतो किंवा फारतर कोणतीही एक आणि एकच निवडतो). आणि उरलेली मुले मुलाखती देत आपल्याला कधी निवडपत्र मिळेल याच्या प्रतीक्षेत असतात. सगळी हुशार महाविद्यालये मोठ्यात मोठे पॅकेज जाहिरातीमध्ये अभिमानाने दाखवितात पण किती विद्यार्थ्यांना नोकऱ्याच मिळाल्या नाहीत याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध करीत नाही.
नोकरीत दरवर्षी आपल्याला पदोन्नती मिळते का? मग दरवर्षी केलेलं काम अपयशी असतं का? तर त्या पायऱ्या असतात पदोन्नतीकडे नेणाऱ्या ! आयुष्यात अपयश असं काही नसतं. काही दिवस यश मिळतं, काही दिवस नाही. कधी आपली पाळी असल्याने चषक आपल्या हाती असतो, कधी तो प्रतिस्पर्ध्याच्या.
हारजीत आणि अपयश या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. थॉमस एडिसन ने १००० वेळा प्रयत्न केले आणि मगच तो बल्ब निर्माण करू शकला. पडझडीच्या या नौकेतून आपण शिकत असतो.
अपयश म्हणजे प्रयत्न थांबविणे. उठून कपडे झटकत पुन्हा आपल्या जीवनहेतूंकडे धाव घेणे म्हणजे पडझड स्वीकारणे. भीती पोटी किंवा अन्य कारणांनी स्वतःवरील विश्वास गमावून बसणे आणि मुख्य म्हणजे त्या सबबीमागे दडणे म्हणजे अपयश !
आपल्या शिक्षणयंत्रणेत आणि आपल्या पालकत्वाच्या संरचनेत आपण विद्यार्थ्यांना कधीच पडझड स्वीकारायला शिकवत नाही. कधीतरी अपेक्षित असे न मिळणे स्वाभाविक आणि नैसर्गिक असते हे त्यांच्या शब्दकोशात समाविष्टच केलेले नसते. अपयश हा जीवनमरणाचा प्रश्न करून ते कोणत्याही किमतीला टाळलेच पाहिजे अशी हाराकिरी मात्र मनावर बिंबविली जाते.
या धावपळीमुळे दमछाक होणारी मुले अपयशामुळे आपल्या स्वप्नांच्या आणि अपेक्षांच्या ठिकऱ्या होतात असं गृहीत धरायला शिकतात.
विरोधाभास म्हणजे ही अपयशाची अदृश्य भीती बरेचदा मूळ अपयशापेक्षा अधिक घातक असते. अशी मुले जेव्हा प्रत्यक्ष जीवनात प्रवेश करतात तेव्हा गांगरून जातात, भांबावून जातात. खरे प्रसंग बरेचदा प्रतिकूल असतात, अडचणीचे असतात, परीक्षा घेणारे असतात आणि त्यामुळे अनुत्तीर्ण करणारे असतात, गुणपत्रिकेतील टक्केवारीचा पराभव करणारे असतात. प्रत्येक वेळी जेते आणि जीत असतातच. एकदा जिंकणे म्हणजे जन्मभर शिखरावर राहणे नसते तद्वत एकदा खाली पडणे म्हणजे कायमची हार नसते.
यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येकाच्या मुलाखतीत त्यांच्या पडझडींचा आणि त्यातून शिकलेल्या धड्यांचा अपरिहार्य उल्लेख असतो. अपयश आपल्या निर्धारांना बळकट करते.
अपयशांमधून मिळालेल्या धड्यांना कवटाळायला शिकले पाहिजे, दूर लोटण्यापेक्षा. ते अनुभव आपल्याला संधी देतात अधिक प्रयत्न करण्याची, नवं शिकण्याची आणि अधिक चांगलं होण्याची.
परिपूर्णतेआधी प्रगतीची आस धरायला हवी.

 लढा अथवा पळ काढा !

सध्याच्या २४x ७x ३६५ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो- " पळा, पळा कोण पुढे पळे तो ! " चोवीस तास दूरदर्शनवर चेहेरा दाखविण्यास सज्ज असलेले लोक तावातावाने त्या वृत्ताचे एकतर समर्थन तरी करतात अथवा खंडन तरी ! आणि त्यासाठी काही पुरातन दाखले. अशी मंडळी थोड्याच वेळात तोंडावर आपटलेलीही दिसतात. त्यांना त्याचे भय/लज्जा असत नाही,हा वेगळा प्रांत ! पण तोपर्यंत त्यांवर आधारित आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तयार झालेले असतात.
(राजकारण नांवाचा एकेकाळचा सुसंस्कृत प्रांत २०१९ पासून आता कसा "डागाळलाय " हे प्रत्ययाला येतंच आहे सध्या.)
आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे.
त्यासाठी " २४ तास थांबा " नामक धोरणाची शिफारस मला योग्य वाटते.

त्यामुळे तावातावात बोललेल्या शब्दांना परत घेण्याची, खंत करण्याची पाळी येत नाही. कोणत्याही परिस्थितीत समोर समस्या आली की आपला "लढा अथवा पळ काढा" हा स्वभाव उद्दीपित होतो आणि बरेचदा "लढा" हा पर्याय घाईघाईत निवडला जातो.आपल्या पूर्वजांना जेव्हा समोर धोका आढळला किंवा कोणतीही भयसूचक जाणीव झाली की त्यांनी मानवी स्वभावाची "लढा अथवा पळ काढा" ही स्वाभाविक विचारसरणी विकसित केली.अगदी जंगलात अचानक समोर वाघ दिसो वा अतिवृष्टीची चिन्हे दिसोत.
वैद्यकीय संशोधन असे सुचविते की अशा तणावांना सामोरे जाण्यासाठी शरीर अंतःस्रावांचे निर्माण कार्य सुरु करते.
सध्याचे मानसशास्त्र सुचविते की प्रत्यक्ष धोका असो वा नसो, आजकाल अशा ताणतणाव विरोधक अंतःस्रावांची निर्मिती सतत होत असते. काहीही प्रत्यक्षात घडले नाही तरीही- मुलाखतीत मला निवडतील की नाही, फलाण्या व्यक्तीच्या भूमिकेमुळे समाजात काही वादंग तर माजणार नाहीत ना, अमुक तमुक राष्ट्राध्यक्ष अणू बॉम्ब तर टाकणार नाही नं इत्यादी इत्यादी !
अशा काल्पनिक भयांमुळेही आपण पटकन "अनागतविधातृ " (आधीच पूर्वतयारी करून ठेवणे) मोडवर जात असतो.
या परिस्थितीत आपली विचार करण्याची,निर्णय घेण्याची क्षमता कुंठीत होते आणि आपण समोरच्यावर तुटून पडल्याने त्याला झालेल्या शाब्दीक जखमांकडे आपले सोयीस्कर दुर्लक्ष होते.
काय करावे बरे?
आपला प्रतिसाद लिहून काढावा (पाठवू नये,व्यक्त होऊ नये) आणि २४ तास थांबावे, थंड व्हावे. ( मीही आता असेच केले. ही पोस्ट लगेच टाकली नाहीए.)
गेले काही महिने मी हे अंगिकारले आहे- बरेचदा माझ्या मेल्स, लेख,पत्र, फोन आणि प्रत्युत्तर " अनसेंट " तरी राहतात किंवा "अनस्पोकन" तरी !
दिवसातून अनेकदा माझ्याबाबतीत हे घडत असतं -घरात किंवा बाहेर !
काही काळ गेल्यानंतर यातले वैय्यर्थ आपोआप लक्षात येते. ज्या घटनेने /परिस्थितीने माझी मनोभूमी व्यापली होती, ती ओसरली असते, किंवा तिचा प्रभाव कमी झालेला असतो अथवा ती क्षुल्लक वाटू लागलेली असते आणि स्वतःचे हसू येते.
" लढा अथवा पळ काढा " या मोड मधून स्वतःला सोडवून घेत मी ते संदेश /मेल्स पुन्हा वाचतो. आता ते एकतर अतिरेकी तरी वाटतात किंवा त्यांत मी दुरुस्त्या तरी करतो. क्षणैक उन्मादात मी वाहवत गेलो नाही (आणि स्वतःच्या नजरेतून उतरलो नाही- कारण आजकाल मी याबाबत फारच असहिष्णू आहे) याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घ्यायला मला आवडते आणि या व्यक्त होण्याला झालेल्या या "उशीरा " बद्दल मला खंतही वाटत नाही.
काहीवेळा याविरुद्धही घडते. विचार केल्यावर मला वाटतं - नाही, या मुद्द्यावर/परिस्थितीवर मी भाष्य करायलाच हवं, कारण मी अजूनही अस्वस्थ आहे. अशावेळी मूळचे लेखन मी बऱ्यापैकी बदलतो आणि चित्राची पार्श्वभूमी वाढवितो.
लय मस्त वाटतं राव !
यापुढे आपल्या मेल्स पाठविण्यापूर्वी, फोनवर नंबर फिरविण्यापूर्वी ५-१० मिनिटे थांबा आणि विचार करा. हा दृष्टिकोन तुम्हाला आमूलाग्र बदलून टाकेल.
It works ! आपुन गॅरंटी देता हैं !
तेव्हा " लढा अथवा पळ काढा " याआधी "थांबा आणि विचार करा".

Tuesday, October 27, 2020

 

घर "बसल्या "काम !

 

कार्यालय आणि घर हे दोन महत्वाचे पण वेगळे कप्पे आपले आयुष्य व्यापून टाकतात. दोन्ही ठिकाणे वेगळी , तेथे असण्याच्या वेळा वेगळ्या ,जबाबदाऱ्यांचे स्वरूप वेगळे ! काय सामाईक असेल तर - दोन्ही ठिकाणी " आपण" असतो.

माहिती -तंत्रज्ञान क्षेत्राचा उगम होईपर्यंत या सीमारेषा बऱ्यापैकी ठळक होत्या. अर्थात घरी कामाची कागदपत्रे आणणारी मंडळीही होतीच. त्यामुळे कार्यालय घरी आणणे आणि (डोक्यात का होईना ) घर कार्यालयात बरोबर नेणे हे चालत आलं आहे. 

माझ्या वरिष्ठांना घरी कामाच्या फाईली ब्रीफकेसमधून नेण्याची सवय (खोड म्हणत नाही कारण ते वरिष्ठ होते) होती. घरी कागदपत्रांचा पसारा मांडून ,सतत फोनवर (त्याकाळी मोबाईल नव्हते) बोलत ते काम करीत बसायचे. पत्नी म्हणायची - " तुमचं ऑफिस घरी आणत जाऊ नका. ते तिथेच ठेवत जा. हे माझं घर आहे ,त्याचं घरपण टिकू द्या ."

अशाप्रकारे रोजची वेळ संपली तरीही कार्यालयात काम करणारे ,सुट्टीच्या दिवशीही कामावर जाणारे आपल्या आसपास सतत असतात. कामाचं स्वरूपच असं असतं की कार्यालयात जाण्यावाचून गत्यंतर नसतं.

पण गेल्या दोन दशकात माहिती -तंत्रज्ञानाने ह्या भिंती पाडल्या आहेत आणि "वर्क फ्रॉम होम "नामक नवी संज्ञा अस्तित्वात आली आहे. या क्षेत्रातील बरंचसं काम  " सेवा " पुरविण्याचे असल्याने संगणक आणि त्यावरील प्रोग्रॅम्स ,सॉफ्टवेअर्स पुरेसे असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधून -मधून घरी काम करण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे त्यांच्या काही व्यक्तिगत समस्यांवर हा यशस्वी तोडगा ठरतो.  तसेच कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ( वाहतूक) बहुतांशी उत्पादक नसतो. पुण्याहून आणि नाशिक /मनमाड हून रोज हजारो प्रवासी रेल्वेने मुंबईला अपरिहार्यपणे ये-जा करतात.संस्थेलाही वाहतुकीसाठी बससेवा किंवा भत्त्यांच्या रूपाने खूप खर्च येतो. तेव्हा  उभयपक्षी त्यांत "लाभ "दायक परिस्थिती असल्याने ही संधी खूप प्रसिद्धी झाली.  

कोविड -१९ चा  विश्वसंचार जसजसा वाढत गेला आणि हे संकट लवकर मिटण्याचे चिन्ह दिसेना ,तेंव्हा अपरिहार्यपणे काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल आवश्यक भासू लागला. गूगल ,मायक्रोसॉफ्ट आणि अशा अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत गरजांवर ( घरून काम , जास्त दिवस रजा, आणि वेतनात कपात करणे ) विचार करायला तातडीने सुरुवात केली. सध्याच्या महामारीने सगळीकडे हातपाय पसरायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे कामाची वेळ , कामाची गुणवत्ता , संसाधनांचा अभाव, तंत्रज्ञानातील अडचणी . बाबत अनेक समस्या निर्माण व्हायलाही सुरुवात झाली आहे.

कार्यस्थळावरील परस्पर संबंध आणि मानवी भावभावनांचे शास्त्र यांवर आता मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु झाले आहे. त्यामधील काही महत्वाची निरीक्षणे -

) घरून काम करताना एकाकीपणाची भावना वाढीला लागते. आणि कोरोनाच्या भीतीदायक सहवासात तर अनिश्चितता आणखी त्रासदायक ठरू शकते.

) भावनांवर नियंत्रण अवघड जाते.

) आसपास सहकारी असले की ताण तितकेसे जाणवत नाहीत.

) घरातील अनौपचारिक वातावरण आणि संस्थेतील औपचारिक वातावरण यातील फरक सुरुवातीला तरी अंगवळणी पडायला वेळ लागतो. घरी ओळखीचे चेहेरे (तसे ते कार्यालयातही असतात) आणि मनमोकळे आप्त ,कुटुंबीय यामुळे कामाचा वेग जरा कमी होऊ शकतो आणि सुस्ती येऊ शकते. शिस्तीचाही बडगा कमी असतो. प्रत्यक्ष देखरेख नसते.

अशावेळी उत्पादक काम तर व्हावे आणि वरील अडचणी येऊ नयेत असं वाटत असेल तर घरबसल्या काम करणाऱ्यांनी काही पथ्ये पाळणे आवश्यक आहेत.

) आपण पाठवीत असलेले -मेल आणि त्यातील मजकूर - बरेचदा लिखाणाचा सूर समोरच्याच्या लक्षात येतोच असे नाही. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता अधिक ! तेव्हा "सेंड "करण्यापूर्वी संदेशाचे पुनर्वाचन महत्वाचे कारण इथे समोरासमोर संभाषण /संवाद नाही आणि त्यामुळे खुलासाही नाही. जर आपला सह -कर्मचारी सुद्धा घरून काम करीत असेल तर दूरध्वनीवर समक्ष बोलणे इष्ट ! तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ कॉल किंवा परदेशातील सहकाऱ्यांशी मिटिंग असेल तर पूर्वनियोजित वेळी कॉन्फरन्स कॉल असे पर्याय आता उपलब्ध आहेत.

) प्रत्येक देशाच्या कालपटाचे (टाईम झोन ) भान ठेवावे - विशेषतः सहभागी कर्मचारी विविध देशांमधून कॉन्फरन्स कॉलमध्ये असतील तर त्यांच्या कालपटाचे भान ठेवणे आवश्यक असते. कॉलची वेळ सर्वानुमते ठरविली तर अधिक उत्तम ! अन्यथा रोजची एक विशिष्ट वेळ ठरविली तर त्यानुसार सगळे आपापले काम सांभाळून सहभागी होऊ शकतात. विषयपत्रिका (अजेंडा) आधी कळविला तर अधिक चांगली पूर्वतयारी करता येईल आणि कॉल जास्त फलदायी होऊ शकेल. प्रत्येकाचे ऐकून घेतल्यावरच निर्णय घ्यावा. कॉलची वेळही मर्यादित असेल तर तो प्रभावी ठरू शकतो. त्यानंतर झालेल्या चर्चेची आणि घेतलेल्या निर्णयांची सर्वांना -मेल द्वारे माहिती द्यावी.

) अचानक उद्भवणाऱ्या विषयांसाठी वेळ ठेवणे -  कार्यस्थळावर जाता -येता सहज काही अनौपचारिक विषय छेडले जातात, बैठकीच्या आधी किंवा नंतर मुद्दाम थोडा वेळ राखून ठेवला तर विषयपत्रिकेवरील विषयांच्या व्यतिरिक्त इतरही चर्चा होऊ शकतात.

) अधून मधून मुद्दाम छोटीशी सुट्टी घेणे - कार्यालयात चहा -नाष्टा ,जेवणाच्या सुट्ट्या ठराविक असतात. घरी काम करताना एकसुरीपणा येणे स्वाभाविक असते अशावेळी अधून मधून पाय मोकळे करावेत. बसण्याची पोझ बदलावी. क्रिकेटमध्ये " टाइम आउट" असा संदेश आला की जसे खेळाडू खेळण्यासाठी परततात तसे कामाच्या टेबलवर परतावे. विशेषतः संगणकासमोर बसून सतत काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो अशा वेळी सहज खिडकीतून अथवा दरवाज्यातून बाहेर पाहिले तरी डोळे निवतात. बहुतांशी माहिती -तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांच्या बाहेर हिरवागार देखावा तयार केला असतो, पाण्याचे प्रवाह सोडले असतात त्यामागे मोकळीक मिळावी ,विरंगुळा मिळावा अशीच संकल्पना असते. तसाही हिरवा रंग डोळ्यांना थंड ठेवतो.

) कामानंतरच्या कामाचे नियोजन - दिवसाचे काम आटोक्यात आले की थोडी विश्रांती , ध्यानसत्र , संगीत ऐकणे किंवा शारीरिक हालचाली ( मर्यादित व्यायाम) अशा गोष्टींचे नियोजन करावे म्हणजे त्या मानसिक चौकटीतून बाहेर पडता येते. अन्यथा मनात कायम काम आणि कामच घोळत राहते. हे असे शट डाऊन किंवा "ऑन -ऑफ "बटन कायम वापरता आले पाहिजे. घरात काम करत असल्याने कुटुंबीयांबरोबर एखादी चक्करही मन / शरीर ताजे करून जाते. विषय बदलतात, विचार वेगळे येतात त्यामुळे निरोगी मर्यादा आखता येतात.

) व्यायामासाठी ठराविक वेळ - रोज कॅलेंडरवर शारीरिक हालचालींसाठी वेळ आखून  ठेवावा. त्यामुळे चपळता वाढते आणि आपण सक्रिय होण्याला हातभार लागतो. त्यासाठी व्यायामशाळेतच जाण्याची गरज नाही आणि सध्याच्या लॉक डाउनच्या काळात ते शक्यही नाही. पण आपल्या आवडीच्या एखाद्या गाण्यावर नृत्य करणे, यू -ट्यूब वरील व्हिडीओनुसार हालचाली करणे सहज घरी जमेल. एखाद्या मित्राबरोबर वर्चुअल व्यायाम हा पर्यायही आहे.

) परस्पर चौकशी /संपर्क - शक्य असेल तर ( वर्चुअल ) चहापाणी , जेवण असे काही आयोजित केले तर कार्यालयातील लंच -टाइम चे दिवस परतून येतील आणि काहीवेळ तरी कंटाळा ,नीरसता जाईल. त्यानिमित्ताने अनौपचारिक चौकशी करता येईल आणि सहकाऱ्यांची खबरबात मिळेल.

अर्थात सगळीच कामे घरबसल्या शक्य नाहीत. जेथे तंत्रज्ञानाचा पर्याय आहे ( जसे वर्तमानपत्रे -पेपर काढताहेत), तेथे तो अवश्य वापरावा. मात्र डॉक्टर , वाहक -चालक , फार्मासिस्ट आणि अन्य अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना घराबाहेर पडण्यावाचून गत्यंतर नाही. अशांनी चेहेरा मास्कने झाकणे , सामाजिक अंतर राखणे , हात स्वच्छ धुणे ही काळजी घेतलीच पाहिजे.

सध्याच्या अनपेक्षित संकटकाळात संस्थाही शक्य तितका प्रयत्न करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घेत आहेत आणि त्याचबरोबर व्यवसाय सुरु ठेवण्याचीही कसरत करीत आहेत. मात्र आव्हाने परीक्षा घेणारी आहेत आणि स्वतःला अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यावाचून पर्याय नाही.

घरबसल्या काम कदाचित अधिक मोठ्या प्रमाणावर भविष्यात (कोरोना संकटानंतरही) पर्याय ठरू शकेल तो गांभीर्याने हाताळला तर खूप समस्या सुटू शकतील. कदाचित कोरोनाची जगभरातल्या नोकरदारांसाठी ही आनंददायी भेट ठरेल.

 

डॉ नितीन देशपांडे

deshpandenh@gmail .com

९८५०८ २६९९०