पडझड की अपयश !
खेळांमधून आयुष्याचे आणि नेतृत्वाचे अगणित धडे गिरविण्याची संधी मिळते. पडायचं, उठायचं, पुन्हा कधीतरी पडायचं अशी पडझड आयुष्यात सुरूच असते. लाटांप्रमाणे जीवन हिंदोळे घेत वरखाली होत असते. एखादा खेळाडू पंधरा मॅचेस खेळला आणि त्यांतील पाच जिंकला म्हणजे दहावेळा तो खेळलाच नाही का?
त्याचा काय परिणाम होत असेल त्यांच्या मनावर? बालपणापासून वर्गातील क्रमांक, टक्केवारी, स्पर्धेतील कौतुक या टॅग्स ने कामगिरी तोलली जाते आणि पडझडीपेक्षा अपयशाला अधोरेखित केले जाते.
मुलाखत घेतानाही आम्ही ७५ टक्केवाला निवडतो आणि ७० टक्केवाल्याला नाकारतो, कारण आमच्या मते टक्केवारी बुद्धिमत्तेचे निर्देशक असते. कदाचित तो ७० टक्केवाला अधिक प्रभावी, यशस्वी कर्मचारी, व्यवस्थापक होऊ शकतो पण संधीच नाकारल्याने आम्ही त्याच्या कर्तृत्वावर बोळा फिरवितो. आमच्या अभियांत्रिकी प्लेसमेंट मध्ये टॉपर्सच्या हाती तीन जॉब ऑफर्स असतात ( ज्यापैकी कदाचित तो एकही निवडणार नसतो किंवा फारतर कोणतीही एक आणि एकच निवडतो). आणि उरलेली मुले मुलाखती देत आपल्याला कधी निवडपत्र मिळेल याच्या प्रतीक्षेत असतात. सगळी हुशार महाविद्यालये मोठ्यात मोठे पॅकेज जाहिरातीमध्ये अभिमानाने दाखवितात पण किती विद्यार्थ्यांना नोकऱ्याच मिळाल्या नाहीत याची आकडेवारी कधीच प्रसिद्ध करीत नाही.
नोकरीत दरवर्षी आपल्याला पदोन्नती मिळते का? मग दरवर्षी केलेलं काम अपयशी असतं का? तर त्या पायऱ्या असतात पदोन्नतीकडे नेणाऱ्या ! आयुष्यात अपयश असं काही नसतं. काही दिवस यश मिळतं, काही दिवस नाही. कधी आपली पाळी असल्याने चषक आपल्या हाती असतो, कधी तो प्रतिस्पर्ध्याच्या.
हारजीत आणि अपयश या संकल्पना समजून घ्यायला हव्यात. थॉमस एडिसन ने १००० वेळा प्रयत्न केले आणि मगच तो बल्ब निर्माण करू शकला. पडझडीच्या या नौकेतून आपण शिकत असतो.
अपयश म्हणजे प्रयत्न थांबविणे. उठून कपडे झटकत पुन्हा आपल्या जीवनहेतूंकडे धाव घेणे म्हणजे पडझड स्वीकारणे. भीती पोटी किंवा अन्य कारणांनी स्वतःवरील विश्वास गमावून बसणे आणि मुख्य म्हणजे त्या सबबीमागे दडणे म्हणजे अपयश !
आपल्या शिक्षणयंत्रणेत आणि आपल्या पालकत्वाच्या संरचनेत आपण विद्यार्थ्यांना कधीच पडझड स्वीकारायला शिकवत नाही. कधीतरी अपेक्षित असे न मिळणे स्वाभाविक आणि नैसर्गिक असते हे त्यांच्या शब्दकोशात समाविष्टच केलेले नसते. अपयश हा जीवनमरणाचा प्रश्न करून ते कोणत्याही किमतीला टाळलेच पाहिजे अशी हाराकिरी मात्र मनावर बिंबविली जाते.
या धावपळीमुळे दमछाक होणारी मुले अपयशामुळे आपल्या स्वप्नांच्या आणि अपेक्षांच्या ठिकऱ्या होतात असं गृहीत धरायला शिकतात.
विरोधाभास म्हणजे ही अपयशाची अदृश्य भीती बरेचदा मूळ अपयशापेक्षा अधिक घातक असते. अशी मुले जेव्हा प्रत्यक्ष जीवनात प्रवेश करतात तेव्हा गांगरून जातात, भांबावून जातात. खरे प्रसंग बरेचदा प्रतिकूल असतात, अडचणीचे असतात, परीक्षा घेणारे असतात आणि त्यामुळे अनुत्तीर्ण करणारे असतात, गुणपत्रिकेतील टक्केवारीचा पराभव करणारे असतात. प्रत्येक वेळी जेते आणि जीत असतातच. एकदा जिंकणे म्हणजे जन्मभर शिखरावर राहणे नसते तद्वत एकदा खाली पडणे म्हणजे कायमची हार नसते.
यशाच्या शिखरावर असलेल्या प्रत्येकाच्या मुलाखतीत त्यांच्या पडझडींचा आणि त्यातून शिकलेल्या धड्यांचा अपरिहार्य उल्लेख असतो. अपयश आपल्या निर्धारांना बळकट करते.
अपयशांमधून मिळालेल्या धड्यांना कवटाळायला शिकले पाहिजे, दूर लोटण्यापेक्षा. ते अनुभव आपल्याला संधी देतात अधिक प्रयत्न करण्याची, नवं शिकण्याची आणि अधिक चांगलं होण्याची.
परिपूर्णतेआधी प्रगतीची आस धरायला हवी.
No comments:
Post a Comment